Monday, 4 October 2021

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी- उद्धव ठाकरे

शाळेची घंटा वाजली
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी

शाळा परत बंद करायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विदयार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. मी वारंवार टास्क फोर्सशी बोलतोय. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

▪️मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. 
▪️आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. 
▪️शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. 
▪️आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. 
▪️पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे.
▪️शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी, निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घ्या 
▪️मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी. 

Friday, 7 May 2021

*राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*मुंबई*- कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रकारांना कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, आणि बिहार या राज्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला महान पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये.

महाराष्ट्रात कोरोनामुळे 124 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे, कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला 50 लाख रुपये मदतनिधी द्यावा, त्यासाठी कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
 *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*

Sunday, 27 December 2020

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रत्नागिरीत गीताजयंतीनिमित्त गीताव्रतींचा सन्मान

रत्नागिरी : केवळ गीता पाठ न करता त्यातील तत्वज्ञान आपलेसे करण्यासाठी या गीताव्रती प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीनेही गीतेतील तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत. सुख-दुःखामध्ये गुरफटून न जाता या दोन्ही बाबतीत साम्यावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन निवृत्त प्रा. डॉ. नीला जोशी यांनी केले. गीता जयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

गीताजयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. नीला जोशी. सोबत डावीकडून डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उज्ज्वला पटवर्धन व वंदना घैसास.

शृंगेरी पीठामध्ये संपूर्ण भगवद्गीता पठण करून पारितोषिक मिळवणाऱ्या गीताव्रती सौ. वंदना घैसास, सौ. उज्ज्वला पटवर्धन यांचा सन्मान केला. सौ. योजना घाणेकर यांच्या वतीने पती सुमुख घाणेकर व सासुबाई घाणेकर बाई व सत्कार सन्मानित करण्यात आले. त्या वेळी डॉ. जोशी बोलत होत्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचा सन्मान संस्कृत विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये यांनी केला. तेव्हा त्यांनी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे कौतुक केले. विविध स्पर्धा, उपक्रमांमधून संस्कृत प्रसाराचे काम हा विभाग करत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमातून गीताव्रती तयार होवोत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यानंतर डॉ. आठल्ये यांनी गीताव्रतींची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी उज्ज्वला पटवर्धन म्हणाल्या, पुण्याच्या गीता धर्म मंडळात गीतेतील संस्कृत शब्दांचे उच्चार कसे करावेत याची माहिती घेतली. नंतर पाणिनीच्या व्याकरणानुसार उच्चारण सुरू केले. 13 महिन्यांत पाठांतर केले. गोकुळाष्टमी उत्सवात जावांनी गीता म्हणण्यास बोलावले. त्या वेळी सर्व 18 अध्याय वाचल्यावर सराव झाला आणि पुढच्या वर्षी पाठ करून येईन असे मी गोपाळकृष्णाला सांगितले. शृंगेरी पीठामध्ये स्पर्धेवेळचा अनुभवही त्यांनी सांगितला. स्पर्धेसाठी सुरुवातीला 500 जणांची प्रतीक्षा यादी होती. देशभरातून येथे स्पर्धक येतात. रत्नागिरीकरांनीही या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गोपाळकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केले. या वेळी डॉ. नीला जोशी यांचा सत्कार प्राचार्य कुलकर्णी यांनी केला. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्कृत विभागाचे विद्यार्थी, रत्नागिरीतील गीताप्रेमी मंडळी उपस्थित होती. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम झाला.

सेवानिवृत्तीनंतरही शक्य झाले

वंदना घैसास म्हणाल्या, योजना घाणेकर यांनी प्रथम 2016 मध्ये बक्षीस मिळवले. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. संस्कृत शिक्षिका असताना शक्य झाले नाही ते सेवानिवृत्तीनंतर शक्य झाले. नारायणी पठण मंडळ तसेच सौ. विशाखा भिडे यांचे मार्गदर्शन मिळाले. दररोज 4 श्‍लोक पाठ करत होते. सकाळी पाठांतर, दुपारी उजळणी पुन्हा संध्याकाळी तयारी सुरू होती. काही शब्द सारखे असल्याने दुसर्‍याच अध्यायात जायला व्हायचे. त्यामुळे स्मरण पठण नोंद ठेवली. दररोज 10 श्‍लोक लिहू लागले व 70 दिवसात 700 श्‍लोक पूर्ण झाले.

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी- उद्धव ठाकरे

शाळेची घंटा वाजली माझे विद्यार्थी माझी जबाबदारी शाळा परत बंद करायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळा...